Wednesday 13 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर             

               भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती. 3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते. भिमराव आंबेडकर
महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे. तरीही त्यांनी फार संघर्ष करून सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले. त्यांना शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.
                      डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले.
बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती. आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती. 
आम्ही लहान होतो तेव्हा त्यांचा व ग्रंथपालाचा एक किस्सा ऐकला होता तो म्हणजे असा की, डाॅ. बाबासाहेब दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला, आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार! ग्रंथपाल एक यहुदी होता. आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते. आज हा लेख लिहत असतांना हा किस्सा आठवला म्हणून लिहावसा वाटला. आणि ह्यावरूनच कळते कि ते किती प्रामाणिक व अभ्यासू होते.

              तर मित्रांनो, आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कसा केला? 
 तर, त्यांनी 
'मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी 1935 साली केली. हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढत अखेरीस 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956.त्या दिवशी बाबासाहेब सकाळी लवकर उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ. आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीकडे निघाले. ते आणि त्यांच्या पत्नी माई 11 ऑक्टोबरलाच नागपुरात आले होते. नागपूर शहराच्या मधोमध असलेल्या दीक्षाभूमीत हजारोंचा जनसमुदाय जमला होता. बाबासाहेब आणि माई तिथे पोहोचून व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हाचे सर्वांत वयोवृद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आलं होतं. व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर चार भिख्खूंनी बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून 'बुद्धं शरणं गच्छामि', 'धम्मं शरणं गच्छामि', 'संघं शरणं गच्छामि' असं म्हणवून घेतलं.जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहणार असे पंचशील म्हणवून घेतले. त्यानंतर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले. बुद्धमूर्तीला पुष्पहार वाहिला.
 हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर 'बाबासाहेब आंबेडकर की जय', 'भगवान बुद्ध की जय' असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले. 
       
                     हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, "मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन." त्यानंतर 'ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं', असं आवाहन त्यांनी जनसमुदायाला केलं. पाहता पाहता सगळे उभे राहिले. त्यांना पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला,'  1955 सालानंतर बाबासाहेबांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होत नव्हता. त्याच काळात 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. जर सर्व अनुयायांनी धर्मांतर केलं नाही तर कसं करायचं, ही भीती एकाने व्यक्त केली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही. ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं," आपली तब्येत खंगत चालली आहे, याची बाबासाहेबांना जाणीव होती. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धर्मांतर केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांत त्यांनी प्राण सोडले. तर आज त्यांची जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

_ एकता चौधरी.

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...