Friday 1 April 2022

गुढीपाडवा शाप कि नविन वर्षाची सुरूवात

गुढीपाडवा शाप कि नविन वर्षाची सुरूवात

                         महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा खरंच काही संबंध आहे का ? गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभुराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखविण्यासाठी काही आरोप केले जातात. सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले, ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभुराजांना ठार केले, वर तुम्हाला हे सांगितले जाईल कि मनुस्मृती, अध्याय आठवा, श्लोक १२५/१२६ या नुसार शंभुराजांना मारले.  आणि काय ते म्हणतात, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली.असा देखील आरोप केल्या जातो. पहिला आरोप आपण पहिला कि ब्राह्मणांनी मनुस्मृती, आठवा अध्याय, श्लोक १२५/१२६नुसार शंभुराजांना ठार केले. पण मात्र त्या श्लोकात, राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार, शिक्षा, दंड वगैरे गोष्टीं सांगितल्या आहेत. 
           
                             श्लोक १२५ व १२६ सांगतो कि हि शिक्षा देण्याच्या जागा आहेत, त्या जागा आहेत पोट, हात, पाय, डोळा, कान व सगळं शरीर (१२५). राजाने गुन्ह्याचे गांभीर्य, काळ, वेळ, उद्देश, जागा अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप व अवयव ठरवावे (१२६). आता सांगा यात कुठे लिहिले आहे मुंडके ? आणि त्याला काठीवर लटकावणे ? आणि शिक्षा हि राजाने करायची असते, मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभुराजांना पकडले आणि मारले ? औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार का वागेल ? हा विचार तुम्ही केलाय का?  आपण हे जे विचार आहेत न की, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो. हे सगळ आपण चुकीच गृहीत धरतो. आणि बरेच लोक समजतात की, गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा शंभुराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरु झाला. आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो, गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध लावणारे अनेक  संदेश गुढीपाडवा येण्याच्या बरोबर काही दिवस आधी तुमच्या फेसबुक, व्हाट्सअँप आणि अनेक प्रसार माध्यमातून झळकतात आणि आपण अशाच कोणत्याही माहितीला खरी समजून विश्वास ठेवतो आणि मग पुन्हा तुमचा समाज विरुद्ध आमचा समाज अशी निर्लज्ज घोषणा देऊन वाट्टेल तसे वागतो, आणि ज्यांनी आपल्याला एकत्र आणले, एकत्र राहावं म्हणून आपले प्राण दिले त्याच शिवराय व शंभूराजांच्या नावाने एकमेकात फूट पाडून बसतो, शिव – शंभू नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो.

                          आता, तुम्ही हा लेख वाचल्यानंतर म्हणाल की, गुढीवर कलश उलटा का टांगतात ?, किंवा हार , साडी आणि कडुनिंबाचा पाला लावून, मनुष्यस्वरूपी देखावा का तयार केला जातो ? असे प्रश्न तुमच्या मनात तयार होतीलच तर,  मित्रांनो महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली  गेली.दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते.
  
                तुमच्या माहितीसाठी सांगते, शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता.  इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले, आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात गुढी पाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. या सोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे कि निराजी पंडित शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि  ते आपल्या घरी गुढी पाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. हे तर आपण पहिले कि शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे. आता पाहूया कि शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता कि नाही. आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य, त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शवते.
संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात. आणि यावरून कळते की, तुकाराम महाराजांना देखील हा सण माहित होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते. 
   
                मित्रांनो या लेखाद्वारे खरी, खोटी माहीती तुमच्या पुढे मांडली आहे. बघा पटत असेल तर असा चुकीचा विचार करु नका, कारण की, 
आपल्या शंभूराजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, माणसामाणसांत जातीभेद केला नाही. आपल्या शंभू राजाने जात-पात विसरून आपल्याला एकत्र यायला शिकविलं, आपण एकत्र राहावं म्हणून शंभूराजांनी प्राण दिले, शंभूराजे कोण्या एका जमातीचे राजे नाहीत कि कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक नाहीत. ते रयतेचे राजे आहेत, शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला हे सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे. याला विरोध करून एकच खोटी गोष्ट हजारवेळा बोलून खरी होत नाही.  हे सत्य पोहचवले पाहीजे म्हणूनच हालेख लिहावसा वाटला! तर असो, आपणा सर्वांना गुढी पाडाव्याच्या व हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.🌸

_ एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...